Principal Message
(श्री.हेमंत प्रभाकर प्रभू)
इ.स.1914 साली ‘महिला शिक्षण मंडळ’ या नावाने सुरू झालेली व पुढे ‘कृष्णराव सीताराम देसाई’ या नावाने नावारूपाला आलेल्या या शिक्षण संस्थेने अलिकडे (2014 मध्ये) आपला ‘शतकोत्सव’ मोठया दिमाखात साजरा केला.
14 जून 1914 रोजी मालवण येथे मुलींच्या इंग्रजी शिक्षणाची सुरूवात कै. कृष्णराव सीताराम उर्फ आबासाहेब देसाई यांनी केली व ख-या अर्थाने संपुर्ण कोकण विभागातील (रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग) स्त्री शिक्षणाचा पाया रचण्याचा इतिहास घडविला. व आज या शैक्षणिक संस्थेच्या बालवाडी वर्गापासून ते महाविदयालयीन शिक्षणापर्यंतची अनेक ज्ञानदानाची क्षेत्रे अविरतपणे कार्यरत आहेत ज्यातून सुजाण, सुशिक्षित व सुज्ञ नागरिकांनी युक्त असा समाज विकसित होण्यास हातभार लागत आहे.
त्यावेळी रत्नागिरी जिल्हयातील प्राथमिक शाळेतील स्त्री-शिक्षिकांना प्रशिक्षणासाठी पुणे किंवा नाशिकला जावे लागे. या अडचणींमुळे स्त्री-शिक्षिका प्रशिक्षणासाठी निवड नाकारीत. त्यामुळे जिल्हयातील बहुसंख्य शिक्षिका अप्रशिक्षित राहिल्या.
या महिला शिक्षण मंडळाचे महत्त्वाचे कार्य स्त्री-शिक्षण प्रसाराचे असल्याने स्त्री-शिक्षण प्रशिक्षणाच्या क्षेंत्रामध्ये ही एक जी भयंकर उणीव/गैरसोय होती ती दूर करण्यासाठी 14 जून 1943 रोजी या संस्थेने कोकण विभागातील स्त्रियांचे पहिले खाजगी ट्रेनिंग कॉलेज सुरू केले.ते म्हणजेच कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळ संचलित ‘सुनितादेवी टोपीवाला अध्यापिका विदयामंदिर.’ व या अध्यापक विदयालयातील छात्राध्यापिकांना बाहेरच्या शाळांमध्ये पाठांच्या सरावासाठी जावे लागू नये म्हणून संस्थेनेच तत्पूर्वी 1941 मध्ये सरावपाठ शाळा अर्थात प्राथमिक कन्याशाळेची स्थापना केली. 1967 पासून या अध्यापक विदयालयात पुरूषांना देखील प्रवेश उपलब्ध करून दिला गेला. व अलिकडेच म्हणजे 2018 मध्ये या अध्यापक विदयालयाच्या यशस्वी वाटचालीस 75 वर्षे पुर्ण झाली. या अध्यापक विदयालयाने बजावलेली खरी कामगिरी म्हणजे 1943 ते 67 च्या दरम्याने शेकडो निराधार स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. व त्यांना आपल्या पायावर उभे राहण्याची व समाजामध्ये प्रतिष्ठेने वावरण्याची धमक दिली. स्थापनेपासून आजतागायत या अध्यापक विदयालयाच्या नावलौकिकाचा व प्रगतीचा आलेख केवळ सिंधुदुर्गातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात कायम चढता राखला तो या अध्यापक विदयालयातून ज्ञानार्जन करून ज्ञानदानाचे कार्य करणा-या असंख्य छात्राध्यापक शिक्षकांनी.
अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी व उज्वल परंपरा लाभलेल्या अध्यापक विदयालयाचा विदयमान प्राचार्य म्हणून मी या संस्थेचा एक महत्त्वपूर्ण व जबाबदार घटक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी माझे सर्व अध्यापकाचार्य व अध्यापकेतर कर्मचारी मिळून या अध्यापक विदयालयाचा हा वारसा जतन करून विदयालयाच्या नावलौकिकात अधिक भर घालण्याचा प्रामाणिक व निष्ठापूर्वक प्रयत्न करीत आहोत.
या निमित्ताने मी, अध्यापक विदयालयाच्या वतीने माझ्या सर्व माजी, आजी व नविन प्रवेच्छूक विदयार्थ्यांना शुभेच्छा देतो.